ठाणे - माझ्या वहिनीकडे काम करू नकोस, अशी एका कामगाराला तलवारीचा धाक दाखवून दिराने धमकी दिली होती. मात्र दिराच्या हातातील तलवार कामगाराने हिसकावून त्याच्याच तलवारीने वार करीत दिराची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा हत्येचा दाखल करत आरोपी कामगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल्या उर्फ हितेश नकवाल असे बेड्या ठोकलेल्या आरोपी कामगारच नाव आहे. तर मुकुंद चौधरी (वय ५५) असे निर्घृण हत्या झालेल्या दिराचे नाव आहे.
मृतकची वहिनी मच्छी विक्रीतून करायची उदरर्निवाह
डोंबिवलीत खंबालपाड्यात मच्छी विक्रेत्या महिलेच्या व्यवसायात आरोपी हितेश हा कामगार म्हणून काम करीत होता. मात्र खंबाळपाडा परिसरात राहणाऱ्या त्या महिलेचा दीर मुकुंद चौधरी याला बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचा राग येत होता. त्यामुळे मृतक मुकुंदने आरोपी हितेशला माझ्या वहिनीकडे काम करू नकोस, असे धमकावले होते.
तलवारीचा धाकच दिराच्या जीवावर बेतला
आरोपी हितेश धमकी देऊनही वहिनीकडे काम करीत असल्याचे पाहून पुन्हा मृतक मुकुंदने आरोपी रितेशला तलवारीचा धाक दाखवून काम सोडण्याची धमकी दिल्याने या दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन जोरदार भाडण झाले. त्यावेळी आरोपी हितेशने मृत मुकुंदच्या हातातील तलवार हिसकावून मुकुंदवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मुकुंदचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हितेशला अटक केली आहे. या हत्येचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.