ठाणे - लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून घरात अडकून पडलेल्या अरूणाचल प्रदेश राज्यातील १० ते १२ विद्यार्थ्यांची शहर पोलिसांनी सुटका केली आहे.
कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. तसे पूर्वोत्तर राज्यातील हे विद्यार्थी देखील चिनी नागरिकांप्रमाणे दिसत असल्याने त्यांना जीवाची भीती वाटत होती. वर्णवाद उफाळून येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला कोंडून घेतले होते. संबंधित विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे येत होत्या. यानुसार जॉईंट सेक्रेटरींच्या आदेशानुसार पोलिसांनी या विद्यार्थ्यांची सुटका केली आहे.
चीन देशातून जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढीस लागले. शहरात वास्तव्यास असणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांमध्ये याबाबत दहशत पसरली आहे. ठाणे व मुंबईत वास्तव्यास असलेले 10 ते 12 विद्यार्थी गेला महिनाभर घरात कोंडून बसले होते. या विद्यार्थांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे आली होती. याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी तत्काळ पावले उचलून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची हमी दिली. तसेच उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंची शिधा मोफत पुरवली. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणहीती कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले.
वर्णद्वेषाच्या भीतीने या विद्यार्थ्यांनी घोडबंदर भागातील ब्रम्हांड आणि मुंबईतील मुलुंडमधील त्यांच्या घरातच कोंडून घेतले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडील सहसचिव (जॉईंट सेक्रेटरी) प्रशांत लोखंडे यांना प्राप्त झाली होती. लोखंडे यांनी ही बाब ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना कळवली. त्यानुसार तातडीने शहर पोलिसांनी या विद्यार्थाचा पत्ता शोधून सर्वांना धीर दिला. तसेच उपायुक्त पाटील यांनी स्वतः पदरमोड करून जीवनावश्यक वस्तुंचे किट बनवले. या मदतीसंदर्भात विद्यार्थानी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाचे आभार मानले आहेत.