ठाणे - सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा डोंगरमाथे चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि रिपरिप पाऊस व गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ व धुक्यात हरविलेल्या वाटा, असा अद्वभूत नजारा प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात कसारा घाटाची सफर करायलाच हवी, असे हे कसारा घाट सध्या पावसाळ्यात हिरवाईने नटले आहे. तर दुसरीकडे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळ पठाराला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली.
डोळ्यांचे पारणे फेडणारे हे निसर्ग सौंदर्य
शहापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-नाशिक या मार्गावर कसारा घाट लागतो. उंच डोंगरमाथे आजूबाजूला दिसणारे घनदाट जंगल घाटातील नागमोडी रस्ते, वृक्षांच्या सभोवताली दिसणारी रांग, उंच, डोंगर-दऱ्या आणि पावसाळ्यातील पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यात लपलेले डोंगर आणि ऊन-सावली यांचा शिवाशिवीचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारे हे निसर्ग सौंदर्य सध्या कसारा घाटात आहे. पावसाळ्यात तर येथील डोंगर माथ्यावरुन खळखळ आवाज करीत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्याची मजा काही औरच आहे. या दऱ्या खोऱ्यातून डोकवणारे हे हिरवेगार सौंदर्य पाहताक्षणी जणू काय कसारा घाट माथ्याने हिरवीगारशाल परिधान केल्याचा भास डोळ्यांना होत असल्याचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याने केले आहे.
परंतु पर्यटकांना यंदा येण्यासाठी बंदी
घाट पायथाशी प्रवास करताना कसारा घाटातील सर्वप्रथम येथून घाटनदेवीचे दर्शन तुम्हाला होते. घाटनदेवीचे दर्शन घेतल्याशिवाय वाहनचालक कसारा घाटातून आपला पुढचा प्रवास करीत नाहीत, असे हे देवीचे जागृत असे स्थान असल्याची श्रद्धा भाविकमध्ये आहे. त्यांनतर घाटात विहिगाव जवळील अशोका धबधब्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक दरवर्षी येथे येतात. परंतु पर्यटकांना यंदा येथे येण्यासाठी बंदी आहे. तरीही पावसाळ्यात मोसमातही पर्यटकांना कसारा घाटाचे हे विलक्षण सौंदर्य भुरळ घालत आहे. मुंबईहून नाशिककडे जाताना अनेक वाहने थांबून हे पावसाळ्यातील निसर्ग दर्शन अनेकजण अनुभवत आहेत. घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो, असे निसर्ग प्रेमी पर्यटक जनार्दन टावरे यांनी सांगितले.
माळ पठारावर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
शहापूर तालुक्यात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कसारा परिसरसतील सर्वात उंच ठिकाण असलेले माळ पठार हे ठाणे जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी अशोका धबधबा तसेच तसेच बळवंतगड, मध्यवैतरणाचा विस्तीर्ण जलाशय, पावसाळ्यात धुक्याची पसरत असलेली चादर तसेच याठिकाणी सुरू असलेल्या पर्यटन विकासकामे यांची पाहणी करण्यासाठी अचानक ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या परिसराला पर्यटन दर्जा मिळून हा भाग विकसित व्हावा यासाठी माळ पठाराचा पाहणी दौरा केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, उप वनसंरक्षक घुले, जिल्हा नियोजन अधिकारी खंडारे, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, सहा. वनसंरक्षक पाटील व वनक्षेत्रपाल. प्रकाश चौधरी उपस्थित होते.
हेही वाचा - यंदा मराठीसह ५ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार - डॉ. अनिल सहस्रबुद्धे