ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर 2 तासांपासून झालेल्या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी या रुग्णवाहिकेला रस्ता करून द्या, अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांना टोल कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना घडल्याने टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने आपल्या कुटुंबासह शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी जात होते. यावेळी मूंबई - नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर 2 तासांपासून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामध्ये एक रुग्णवाहिका अडकली असून वाहतूक लवकर खुली करा, अशी विनंती त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना केली. त्यावेळी तेथील वाहनातील प्रवाशानी खाली उतरून रुग्णवाहिकेला रस्ता करून द्या अशी मागणी केल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी उलट उत्तर देत निंबाळकर यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे प्रवाशांमधून या मुजोरीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी टोल वसुली करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब निंबाळकर यांनी केली आहे.
सुट्टीच्या दिवशी मुंबई परिसरातील पर्यटक शिर्डी, नाशिक करता जात असातात. या परिसरातील पडघा टोल नाक्यावर कोणतीच व्यवस्था, नियोजन नसल्याने आणि टोल कर्मचाऱ्यांच्या दादागिरी मूळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागमी प्रवाशी करत आहेत. या घटनेचे प्रवाशांतील व्यक्तीने मोबाईल चित्रिकरण करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने पुन्हा एकदा पडदा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची दादागिरी समोर आली आहे.