नवी मुंबई - ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शहरात वाढता कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या तसेच शहरातील इतर वैद्यकीय समस्यांसंदर्भात नवनियुक्त मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी पालिकेने त्वरित व्हेंटिलेटर खरेदी करण्याची मागणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांची लूट होत आहे. त्यामुळे प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये पालिकेचा अधिकारी नेमून द्यावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. तसेच खासगी रुग्णालयातील अधिकारी, बेड्स, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सच्या उपलब्धतेबद्दल पालिकेने ऑनलानइ नोंद ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पावसाळ्यात अनेक साथीचे रोग पसरत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्व रुग्णालये 'कोविड रुग्णालये' म्हणून घोषीत केल्यामुळे अन्य रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाशीमध्ये असणारे नवी मुंबई महापालिका हॉस्पिटल हे नॉन कोविड म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य रुग्णांना खुले करावे, असे ते म्हणाले. या संदर्भातही नवी मुंबई महापालिका नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
वाढती रुग्णसंख्या पाहता नवी मुंबई शहरात एकही व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे धक्कादायक वक्तव्य करत नाईक यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार केली आहे. अशातच मनपा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात देखील व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई मनपामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यात प्रामुख्याने स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.