ठाणे - लाॅकडाऊनचा फायदा घेत तब्बल ९०० ते १ हजार रुपये प्रती किलो या भावाने मटण विक्री करणाऱ्या मटण विक्रेत्यांची तक्रार ग्राहकांनी पोलिसांना केली. यानंतर पोलिसांनी मटण विक्रेत्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. अखेर मटण विक्रेत्यांनी देखील पोलिसांपुढे नमते घेत, ६०० ते ७०० रुपये प्रती किलोनेच मटण विक्री करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' विशेष : जयपूरमधील निवाऱ्यांचे रिअॅलिटी चेक!
आज सकाळपासूनच ठाण्यातील कोपरी येथील मार्केटमध्ये मटण खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यावेळी कोपरीतील तुळजा भवानी मटण शाॅपवर ग्राहकांची गर्दी पाहून विक्रेत्याने गर्दीचा फायदा घेत मटण ९०० ते १ हजार रुपये किलोने विकण्यास सुरुवात केली. मात्र, यावर काही ग्राहकांनी आवाज उठवला आणि पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तसेच, कोपरी मार्केटमध्ये जाहीर सूचना करत सर्व दुकानदारांना चढ्या भावाने वस्तू न विकण्याची सक्त ताकीद दिली.