नवी मुंबई - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे स्थानिक आमदार मंदा म्हात्रे व माजी खासदार संजीव नाईक यांच्या तक्रारी नंतर आज वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - Indian Students in Ukrain : महाराष्ट्रासह भारतातील ५०० विद्यार्थी बँकरमधून बाहेर; मायदेशी परतणार
नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वाशी पोलीस ठाण्यात गावडे यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर वाशी पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवारी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये आंदोलन केले होते. यावेळी या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी भाषण करताना, अमृता फडणवीस यांच्याविषयी बोलताना, आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पद्धतीने रस्त्यावर आली नव्हती. परंतु, ही डान्सबारमधली रस्त्यावर उतरते, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे, भाजपाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी गावडे यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे शनिवारी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार वाशी पोलिसांनी गावडे यांच्या विरोधात विनयभंग करण्याच्या उद्देशाने अपशब्द वापरल्या प्रकरणी कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - इकबाल कासकरची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी