ठाणे/नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार जणांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, दिंडोशीचे खासदार कपिल पाटील, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार व भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे बोलले जात आहे.
कपील पाटील यांची राजकीय कारकिर्द -
खासदार कपील पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजपकडून ताकद -
२०१४ च्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना संधी दिली जाणार असून, तसे झाल्यास ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत खासदार पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ठाणे शहरात व अन्य काही शहरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील ती गरज पूर्ण करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.
ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील सेनेच्या सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना संधी देण्याचे धोरण भाजपचे असल्याचे बोलले जात आहे.
खासदार कपिल पाटील यांचा जीवनपट प्रवास -
जन्म – ५ मार्च १९६१
जन्मगाव – हायवे दिवे ता.भिवंडी
शिक्षण – बी ए मुंबई विद्यापीठ
सरपंच – १९८८ ते १९९२ ग्रामपंचायत दिवे अंजुर
सदस्य – १९९२ – १९९६ पंचायत समिती भिवंडी
सभापती – 1997 पंचायत समिती भिवंडी
सदस्य – २००२ – २००७ जिल्हा परिषद ठाणे
सभापती – २००५ ते २००७ जिल्हा परिषद कृषी समिती
अध्यक्ष – २००९ – २०१२ जिल्हा परिषद ठाणे
अध्यक्ष – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत २०१० – २०११ आणि २०१२ या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला आहे.