ठाणे - कोरोनाच्या सावटामध्ये दहीहंडी सणात अनेक आपत्ती आल्या. मात्र कोरोनाचे नियम आणि योग्य ती खबरदारी घेऊन मनसेच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे विश्वविक्रमी दहीहंडी साजरा करणार आहेत.
'हंडीमध्ये सामील व्हावे'
योग्य ती खबरदारी घेऊ आणि येत्या 31 ऑगस्टला दहीहंडी सण साजरा करू, असे पानसे म्हणाले. पानसे यांनी अनेक मंडळांना आवाहन केले आहे, की त्यांनी दोन्ही लस घेऊन हंडीमध्ये सामील व्हावे. आपल्या मराठी सणांसाठी एकत्र यावे व आनंदात सण साजरे करावेत. दरम्यान, मनसेच्या आवाहनाकडे प्रशासन आणि पोलीस कसे पाहतात, हे औत्सुक्याचे आहे.
दोन वर्षांपूर्वी केला होता सविनय कायदेभंग
मागील दोन वर्षांपूर्वी जेव्हा दहीहंडी पथकांना उंचीचे बंधन होते, तेव्हा मनसेने सविनय कायदेभंग करत दहीहंडीचे आयोजन केले होते. तेव्हा शेकडो मंडळे ठाण्यात आली होती आणि त्यानंतर मनसेच्या आयोजकांवर गुन्हादेखील दाखल झाला होता. आता पुन्हा हे आयोजन झाल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.