ठाणे - संस्कृती जपण्यासाठी सण साजरे करायचे आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा आणि तितक्या वेळा कारागृहात जाण्याची तयारी असलेले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज अखेर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हंडी फोडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही हंडी फोडताना पोलिसांचा मोठा दबाव त्यांच्यावर होता. पोलीस वारंवार सूचना आणि अटकाव करण्याचे काम करत होते. असे असतानाही रुग्णालयातून फक्त हंडीच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी हाताला आय व्ही लावूनच अविनाश जाधव सकाळपासून आंदोलन करताना पाहायला मिळाले.
प्रकृती ठीक नसल्यामुळे अविनाश जाधव हे मागील दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्याआधी त्यांनी सरकारच्या विरोधाला न जुमानता दहीहंडी करणारच हे जाहीर केले होते. त्यावर अनेक गोविंदा पथकांनी त्यांना आपल्या उत्सवात सहभागी होत असल्याचे सांगून नोंदणीही केली होती. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे अविनाश जाधव यांना या कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. अखेर रुग्णालयातून मैदानात आणि मैदानातून तुरुंगात अविनाश जाधव यांना पाठवण्यात आले.
संध्याकाळी जामिनावर मुक्तता
अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर संध्याकाळी न्यायालयातून जामीन मिळाला. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना घरी पाठवण्यात आलं. आपली संस्कृती जपण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल, असे म्हणत राज्य सरकारविरोधातील जुलूमशाही बंद करण्याचा नारा देत त्यांनी देखील घरचा रस्ता धरला.
अविनाश जाधवांवर डझनभर केसेस
मनसे आणि पोलिसांचा सुरूवातीपासूनच वाद पाहायला मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडवत असताना अविनाश जाधव यांच्यावर आतापर्यंत डझनभर केसेस दाखल झाल्या आहेत. मात्र लोकांसाठी आणखी कितीही केसेस घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.