ठाणे - जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याप्रमाणेच समाजातील तृतीयपंथीय घटकाने आम्ही ही माणूसच आहोत, लॉकडाऊन काळात आमचीही उपासमार होत आहे, तसेच आम्हालाही आमच्या आरोग्याची काळजी आहे. आम्हाला लस कधी मिळणार अशी खंत व्यक्त केली आहे. लॉकडाऊन काळात सरकारने आमच्यासाठी काहीतर विशेष तरतूद करायला हवी, आमच्याकडे लस घेण्यासाठी आधारकार्ड देखील नाहीत, त्या दृष्टीने सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी तृतीयपंथीय नागरिकांनी यावेळी सरकारकडे केली आहे.
![ठाण्यातील तृतीयपंथीयांना मदत करताना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/attachedvideopics_21052021185110_2105f_1621603270_361.jpg)
तृतीयपंथी समाजाकडे कोणाचे लक्ष नाही, या लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणी मदत करत नाहीत, किंवा सरकारकडूनही आमच्यासाठी कसलीच तरतूद करण्यात आली नाही. आज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारकडून लसीकरण सुरुवात करण्यात आले आहे. मात्र, आमच्याकडे आधारकार्ड नाही, ना कोणती कागदपत्रे अशा परिस्थिती आम्हाला लस कशी मिळणार, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आम्हाला लस मिळणार का नाही, या विचाराने आमचा जीव टांगणीला लागला असल्याची भीतीही या तृतीयपंथीयांनी व्यक्त केली. तसेच सरकारने तृतीयपंथीय घटकासाठी स्वतंत्रपणे मदत जाहीर करावी, लसीकरणासाठी देखील प्राधान्य द्यावे अशी मागणीही या तृतीयपंथीय नागरिकांनी केली.
लसीकरणाची मोहीम ही मोठ्याप्रमाणात सुरू आहे. मात्र, या समाजातील नागरिकांचे लसीकरण अद्याप झाले नाही.त्यांच्यासाठी एकाद्या रुग्णालयात विशेष मोहीम राबवायला हवी,अशी मागणी भाजपा आमदार सतीश केळकर यांनी केली. तसेच राज्य सरकारचे लसीकरणाचे धोरण नियोजन शून्य असल्याची टीका यावेळी आमदार केळकर यांनी केली. सरकारचे लसीकरणातील नियोजन कमी पडत आहे. त्यामुळे अनेक लोक लसीपासुन वंचित आहेत, असा थेट आरोप ठाण्यातील भाजप आमदार यांनी केलाय .