ठाणे - मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा काढलेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा एकदा मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सोमवारी 26 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सीएसएमटी स्थानकापासून मंत्रालयापर्यंत निघाणार आहे. तसेच सरकारने २ दिवसात समाजाच्या मागण्या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा व सकल मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन मोर्चाविषयी माहिती दिली. या मोर्चात समन्वयक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच प्रशासनाने मोर्चा अडवल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
या आहेत मागण्या
सामान्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे, 2014 च्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, 72 हजार मेगा भरतीतील विद्यार्त्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, अशा विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर धडक मोर्चा निघणार आहे.