ठाणे - ठाण्यातील स्वामी विवेकानंद नगरचे शाखाप्रमुख मनोज नारकर हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. ते गेल्या तीन दिवसांपासून गायब असल्याचा गौप्यस्फोट विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी काल विधान परिषदेत केला. नारकर यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी डावखरे यांनी सभागृहात केली आहे. सभागृह प्रमुखांनी डावखरे यांनी सांगितलेल्या प्रकरणाची नोंद घेतली. यावेळी डावखरे यांनी नारकर यांच्या पत्रातील माहितीही सभागृहात वाचली.
हेही वाचा - Husband Suicide : पत्नीने मुलीचा चेहरा व्हिडिओ कॉलवर न दाखवल्याच्या नैराश्येतून पतीची आत्महत्या
पत्रात लिहिले आहे की..
जय महाराष्ट्र
जेरी डेव्हिड यांच्या धमक्या, मनमानी कारभार व पक्षविरोधी वागणुकीला कंटाळून मी मनोज नारकर माझा जिवन प्रवास संपवत आहे. जेरी डेव्हिड यांच्या धमक्या हुकूमशाही व पक्षविरोधी कामाचा माननीय पालकमंत्री साहेब व माननीय ठाणे जिल्हाप्रमुख साहेब यांच्याकडे गेली चार साडेचार वर्षे जे सत्य आहे, ते लेखी स्वरुपात पत्रव्यवहार करत आहे. याची माहिती शाखेतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना दिलेली आहे. त्यासाठी मला व माझ्यासोबत असणाऱ्या मित्र परिवाराला जिवे मारण्याची भाषा समाजात पसरवत आहे. पुढील निवडणुकीमध्ये या पत्राचा फटका मोठा बसू शकतो. म्हणून त्या आधी विभागातील नागरिकांना काम व एकही रुपया न देणारा माणूस आज विभागातील पदाधिकारी युवकांना व रहिवासी यांना पैसा व दारूचे आमिष दाखवून आपल्या गुंड प्रवृत्तीत ओढत आहे व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्याबद्दल भडकून माझ्यावर व मित्रांवर मारहाण किंवा खुनाचा प्रकार होणे आहे. म्हणून असा प्रकार घडू नये, विभागातील माझ्या मित्रांवर गुन्हे दाखल होऊ नये, म्हणून मी माझा जीवन प्रवास इथेच थांबवत आहे. कारण पैसा सत्ता व पोलीस प्रशासन जेरी डेव्हिड यांच्या खिशात असल्यामुळे मला न्याय मिळणार आहे की नाही, हे मला माहीत नाही.
आपला मित्र
मनोज ह नारकर
(शाखाप्रमुख)
माझ्या अंत्ययात्रेत येणाऱ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, विभागातील गुंड प्रवृत्ती पळवून लावण्यासाठी शाखेतील नगरसेविकेचे कार्यालय व जिमचे सामान बाहेर काढून त्याचा टॅक्स शिवसेना पक्षाच्या नावे लावण्यात आल्यावरच माझ्या प्रेताचे अंत्यदर्शन व अंत्ययात्रा काढण्यात यावी ही विनंती.
आम्ही शोध घेत आहोत ठाणे पोलीस
ठाणे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून त्यांनी मनोज यांची बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे आणि त्यांच्याबाबत शोध सत्र सुरू आहे. लवकरच याबाबत शोध लागेल, असे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी सांगितले.
जुनाच वाद
या आधी जेरी डेव्हिड यांच्याबाबत अनेकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे. या आधी मनोज आणि जेरी यांच्यात वाद देखील झाले आहेत. जेरी यांची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असल्याचेही मनोज यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Prison fights : तंबाकू मळण्यावरून दोन कैद्यांत जेल मधे हाणामारी