ठाणे - शहरातच नव्हे, तर ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याला राज्य सरकार आणि स्थानिक महापालिकाच जबाबदार आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात आयुक्त बदल्यामागे काहीतरी षडयंत्र असून वाढत्या कोरोनावर आळा न बसल्याचे हे अपयश असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात केले.
प्रवीण दरेकर यांनी आज ठाणे शहरात येऊन क्वारन्टाईन सेंटर, नव्याने बनवण्यात आलेले कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी विविध रुग्णांना होणार त्रास, अपुऱ्या सोयी सुविधा, तसेच खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट याबद्धल त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर यावर उपाययोजना ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी करावी, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.
ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. राज्य सरकार आणि अधिकारी यामध्ये समन्वय नाही. व्यवस्थेमुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. ठाण्यात क्वारंटाईन सेन्टर उभे करण्यात आले आहेत. मात्र डॉक्टर, नर्स नाहीत, अशी देखील टीका दरेकर यांनी केली. मनुष्यबळ उभे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालकमंत्री शिंदे यांचे पंख तर छाटले जात नाही ना
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त आणले होते. मात्र, काही महिन्यातच आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मुख्य सचिवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे उद्योग तर सुरू नाहीत ना, असा एकप्रकारे संशय मला वाटत असल्याची गंभीर टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.