ठाणे - यंदा दिवाळीनिमित्त चिनी बनावटीच्या पणत्यांना बाजूला सारत ठाणेकरांनी भारतीय बनावटीच्या पर्यावरणपूरक पणत्यांना पसंती दिली आहे. कोरोनामुळे गोमय म्हणजेच शेणापासून बणवलेल्या आणि पंचगव्य दिव्यांना प्रचंड मागणी आहे. त्याचप्रमाणे पंचगव्य उटणेही बाजारात आले आहेत. हे सर्व गोमयापासून बनविलेले असल्याने सध्याची परिस्थिती पाहता यांनाच प्राधान्य दिले आहे.
पर्यावरणपुरक दिवे
दिवाळीनिमित्ताने जागोजागी पणत्यांची दिव्यांची विक्री सुरू आहे. यंदा पणत्यांमध्ये गोमय दिवे आणि पंचगव्य दिवे हे आकर्षण ठरत आहे. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने आरोग्याच्या दृष्टीने या दिव्यांना तुफान मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हे दिवे जाळल्यानंतर ऑक्सिजन निर्माण होतो आणि याचा सुगंध शरीरासाठी चांगला असतो. यात कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर केला नसून १०० टक्के पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत या दिव्यांना चांगली मागणी असल्याचे दर्शना धुरी यांनी सांगितले. याआधी देखील हे दिवे बाजारात विक्रीसाठी येत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना या दिव्यांचे महत्त्व पटू लागल्याने ठाणेकर या दिव्यांकडे वळले आहेत, असे पूजा धुरी यांनी सांगितले.

परवडणाऱ्या दिव्यांच्या किंमती -
गोमय दिवे हे १०० रुपये डझन तर पंचगव्य दिवे हे १२५ रुपये डझन आहे. गोमय दिवे हे गोमूत्र आणि शेण यांच्यापासून बनविलेले आहेत. तर पंचगव्य दिवे हे गायीचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही या पदार्थांपासून बनविलेले आहेत. यात पंचगव्य दिव्यांना अधिक मागणी असल्याचे दर्शना यांनी सांगितले. दिवसाला किमान १० डझन तरी दिवे विकले जात असल्याचे त्या म्हणाल्या. बाजारात गायीच्या शेणापासून बनविलेले पंचगव्य उटणे देखील आले आहेत. हे उटणे ३० रुपयांना ३० ग्राम अशा दराने मिळत आहेत. दिव्यांपेक्षा उटण्यांला जास्त मागणी असल्याचे पूजा यांनी सांगितले. गोमय लक्ष्मीपूजन किट बाजारात आला असून याची किंमत ९९ रुपये आहे. यात लक्ष्मीची पाऊले, गोमय दिवे, संभरानी धूपवाटी आणि निर्माल्य धुपाची काडी असून ही धुपाची काडी निर्माल्यापासून बनविण्यात आली आहे.
