ठाणे - मंगळवारी 7 एप्रिलला दुपारी 12 वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात दुरध्वनी करून एका मजुराने वसंतविहार येथील इमारतीच्या बांधकाम स्थळी 40 मजूर उपाशी असल्याचे सांगितले. यानंतर तातडीने आपत कालीन कक्षप्रमुख संतोष कदम व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाहणीअंती मोहम्मद हुसेन या मजुरानेच हा बोगस फोन केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला चितळसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी माणुसकी दाखवत हुसेन याला समज देऊन सोडले.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवल्याने लॉकडाऊन कालावधीत कुणी बेघर, स्थलांतरीत अथवा मजूर उपाशी राहु नये, यासाठी प्रशासनासह अनेक सामाजिक संस्थाच्यावतीने भोजनाची, अल्पोपहाराची मदत केली जात आहे. असे अनेक कॉल पोलीस, महापालिका आणि सामाजीक कार्यकत्यांना सध्या येत असतात. मंगळवारी दुपारच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये मोहम्मद हुसेन या व्यक्तीने फोन करून कळविले की, वसंतविहार येथील आशर बिल्डिंग (कन्स्ट्रक्शन साईट) येथे 40 व्यक्ती उपाशी असून आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी तात्काळ आपल्यापथकासह पाहणी केली. यावेळी असे निदर्शनास आले की, सदर व्यक्तीने खोटा फोन केला होता. ही बाब चितळसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच मजूर हुसेन याला ताब्यात घेऊन नंतर समज देऊन सोडण्यात आले.