ठाणे - शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या कारला मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात झाला. अपघातात बरोरा कुटुंब बचावले आहे. मात्र, सोशल मीडियावरुन तालुक्यात अपघात झाल्याची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली.
शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांच्या कारने त्यांच्या पत्नी प्रियांकाताई बरोरा, सासू आणि सासरे एका लग्न सोहळ्यासाठी माळगावी जाताना ओहलाचीवाडी (लतीफवाडी) येथे सायंकाळी ४ च्या दरम्यान हा अपघात झाला. यावेळी आमदार बरोरा हे पक्षाच्या कामानिमित्त शहापूरमध्येच असल्याने ते अपघातावेळी कारमध्ये नव्हते.
दरम्यान, आमदार पांडुरंग बरोरा यांनी काही वेळातच सोशल मीडियावर आपण व आपले कुटुंब सुखरूप असल्याची पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे अपघातात आमदार व त्यांचे कुटुंब जखमी झाल्याची अफवा असून त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रीया आमदार पांडुरंग बरोरा यांनी पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना दिली आहे.