ठाणे - दरवर्षी जन्माष्टमी नंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जात असतो. तथापी या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडणार आहे. दरम्यान दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
यंदा देशात कोरोनाचे सावट असल्याने एकत्र येणे कठीण झाले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या कोरोनावर कोणती लस विकसित झाली नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. पण अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करत हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काळजी घेण्याची गरज आहे.
उत्सवावर विरजण पडले असून 'यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव आपण एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढूच असे गोविंदा पथकाने सांगितले आहे. परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना महामारीला आळा घालूया. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील इतरही शहरात दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी देखील हा सण साजरा न करण्याचे ठरवले आहे.