ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेने वेढा घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे, कल्याण-डोंबिवली महापालिका देशातील अस्वच्छ शहराच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. 'अस्वच्छ शहर' म्हणून पालिकेवर शिक्का बसला आहे. शहरावरील हा शिक्का पुसण्यासाठी, मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली मध्येही स्वच्छतेसाठी 'क्लीन-अप मार्शल' तैनात करण्यात आले आहेत. हे क्लीन-अप मार्शल सार्वजनिक ठिकाणी फिरून, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर व रस्त्यावर कचरा टाकण्याऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. या मार्शल्सनी पहिल्याच दिवशी दिवसभरात सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर चांगलाच चाप बसण्यास सुरुवात झाली आहे.
![कल्याण-डोंबिवली महापालिका, clean-up marshals](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh_tha_2_kdmc_cleanup_marsahal_3_photo_mh_10007_1708digital_1566042714_398.jpg)
कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली असली, तरी शहराची स्थिती फारशी समाधानकारक नाही. स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा दर्जा कमालीचा घसरला असून, कचऱ्याचे जागोजागी साचलेले ढिग, मुसळधार पावसानंतरही नाल्यात पडलेला कचरा आणि घाणीवर घोंगवणाऱ्या माशा यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहर स्वच्छतेसाठी वारंवार पालिकेतर्फे आव्हान करून आणि यापूर्वीही दंडात्मक कारवाई करूनही स्वच्छतेबाबत नागरिक फारशी जागरूकता दाखवत नाहीत. त्यामुळे अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
क्लीन-अप मार्शल या पार्श्वभूमीवर ठेकेदारी पद्धतीने 120 मार्शल नेमण्यात आले असून, स्टेशन परिसरासह चौका-चौकात तसेच रस्त्यारस्त्यांवर या मार्शल्सची करडी नजर राहणार आहे. उघड्यावर कचरा टाकल्यास एकशे पन्नास रुपये दंड, रस्त्यावर थुंकल्यास शंभर रुपये दंड, उघड्यावर लघुशंका केल्यास 100 रुपये दंड तसेच उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच एखाद्याकडे पैसे नसल्यास त्याला शिक्षा म्हणून पाच ठिकाणचा कचरा उचलावा लागणार आहे.