ठाणे - भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर मोदी सरकार पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संबंधित हेरगिरीचे काम इस्राईलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली असून, संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव मोदी नामक पाताळयंत्री हुकुमशाहाने रचल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नसून, त्याविरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
देशातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधील व्हॉट्सअॅप मेसेज 2019च्या मे महिन्यापर्यंत नकळत वाचले जात असल्याचा खळबळजनक दावा आव्हाड यांनी केला आहे. व्हॉट्सअॅपने इस्राईलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियामध्ये दाखल केलेल्या खटल्यात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
एनएसओ ही कंपनी पेगॅसिस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते; आणि धारकाच्या स्मार्टफोनमध्ये ते चलाखीने पेरते. 'एक्सप्लॉईट लिंक' या नावाचा पर्याय नकळत क्लिक केल्यास पेगॅसिस धारकारच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो, असे आव्हाड म्हणाले. त्यानंतर व्हॉट्सअॅपने कितीही सुरक्षेचे उपाय योजले, तरी तुमचे पेगॅसिस वाचू शकतो; हे या खटल्यामुळे उघडकीस आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
याबाबत आव्हाड यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून, सामान्य माणसे, कार्यकर्ते यांच्यावरील हेरगिरी आपण सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना, 1970-71 मध्ये अमेरिकेत हेन्री किसिंजर आणि अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यानंतर निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या देशातही कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांना फोन टॅपिंग प्रकरणाची जबर किंमत मोजावी लागली; त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता, असे आव्हाड म्हणाले.
काही दिवसांनी मोबाईल बेडरूममध्ये ठेवून तुम्हाला कपडे बदलणही शक्य होणार नाही. भारतीय लोक आपल्या शयनकक्षामध्ये काय करताहेत, यावरदेखील इस्रायलच्या एनएसओ समूहाचे लक्ष असेल, असे आव्हाड म्हणाले. तसेच ही माहिती इस्राईलच भारत सरकारला देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, सॅनफ्रॅन्सीस्कोमध्ये व्हॉट्सअॅपने एक गुन्हा दाखल केला आहे. यानुसार, इस्राईलच्या यंत्रणांनी पेगॅसिस नावाचे एक अॅप वापरुन लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या फोनमध्ये त्यांना न विचारता एक अॅपची घुसखोरी करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून भारतातील दलित कार्यकर्ते, शहरी आंदोलक, काही राजकारणी, पत्रकार यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. हे सर्व इस्राईलची यंत्रणा वापरुन करण्यात येत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी इस्राईल व मोदी यांच्यामधील घनिष्ठ संबंध अधोरेखित केले.