ठाणे - ठाण्यात 'लसीकरण आपल्या दारी' या नावाने लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून रुग्णशय्येवर असलेले रुग्ण, ४५ वर्षांवरील दिव्यांग आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा - बांधकाम विकासकांच्या टोळीने शेतकऱ्याला लावला ३७ कोटींचा चुना; गुन्हा दाखल
सध्या ठाण्यात कोरोनाचा कहर कमी होत असून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ठाणेकरांना लस कमी पडू देणार नाही, असे महापौर नरेश म्हस्के नेहमीच सांगतात. त्यातच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनेक दिव्यांग व्यक्ती, आजाराने अंथरुणाला खिळलेले व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक हे लस घेण्यासाठी केंद्रावर येऊ शकत नसल्याने लसीकरणापासून वंचित राहिले होते. ही बाब लक्षातच येताच राज्य सरकारने त्यांना घरी जाऊन लस देण्याचा निर्णय पारित करताच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, सभागृनेते आणि इतर नेत्यांनी लसच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.
लसीकरण आपल्या दारी
लसीकरण आपल्या दारी या नावाने सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत रुग्णशय्येवर असलेले रुग्ण, ४५ वर्षांवरील दिव्यांग व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार असल्याची घोषणा आज महापौरांनी केली.
टीएमटीमधून होणार लसीकरण
ठाणे परिवहन सेवेची सुसज्ज विशेष बस यासाठी वापरण्यात येणार असून त्याचे उद्घाटन आज महापौरांनी हिरवा झेंडा दाखवून केले. विशेष म्हणजे, आधारकार्ड प्रमाणे कोणतेही ओळखपत्र नसलेल्या फेरीवाले, भिकारी, मनोरुग्ण यांना देखील लस देणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.