ठाणे - बायकोच्या चारित्र्याचा संशय घेणाऱ्या नवऱ्यानेच भर रस्त्यात मटण कापण्याच्या सुऱ्याने गळ्यावर वार करत तिची हत्या ( Husband kills wife in Bhiwandi ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाच नवऱ्याने वऱ्हाळ तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी पाण्यात उड्या मारून त्याला वाचवत भिवंडी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आनंद वाघमारे असे बायकोची हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर भागात आरोपी आनंद वाघमारे हा मृतक बायको मीना सोबत राहत होता. तर याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान असून त्याची बायको मीनाही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे. या दरम्यान मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या बायकोवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होती. त्यातच पुन्हा याच कारणावरून मागील तीन दिवसांपासून हा वाद वाढत गेला. मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला कि, रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. त्यानंतर आनंद याने आपल्या सोबत असलेल्या पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून बायकोच्या गळ्यावर, पोटावर सपासप वारकरून तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तेथेच टाकून नजीकच्या तलावात उडी मारली होती.
तरुणांनी वाचवला आरोपी नवऱ्याचा जीव -
तलावात उडी मारल्यानंतर आरोपी पाण्यात गटांगळ्या खात असताना परिसरातील युवकांनी पाण्यात उड्या मारून त्याला पाण्या बाहेर काढले. तर काही नागरीकांनी त्याच्या पत्नीस स्व इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपी आनंद यास पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याच्या पिशवीतून ज्या सुऱ्याने बायकोची हत्या केली. तो सुराही पोलिसांनी जप्त केला आहे.
आज आरोपीला न्यायालयात हजर करणार -
दरम्यान उपचार सुरु असताना काही वेळातच पत्नी मीना हीचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंदला ताब्यात घेत अटक केले आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरु केल्याचेही सांगण्यात आले.
हेही वाचा - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीची नोटीस