मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात कार्यरत असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या शेकडो पालिका कर्मचाऱ्यांना मनसेत प्रवेश केला आहे. ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. खोटे आश्वासन न देता भविष्यात कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे जाधव म्हणाले.
श्रमजीवी संघटनेला खीळ
माजी आमदार विवेक पंडित यांची श्रमजीवी कामगार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील प्रथम श्रेणी ते चतुर्थ श्रेणीमधील अधिकारी कर्मचारी श्रमजीवी संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या करूनदेखील प्रशासनाकडून आजपर्यंत ठोस मदत मिळाली नाही. प्रत्येक मागण्यांसाठी श्रमजीवी संघटना आंदोलन करताना दिसून आली. परंतु कर्मचारी वर्ग नाराज असल्याने आज मनसेच्या कामगार संघटनेत शेकडो कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, औषध फवारणी, सफाई कामगार, वन विभागाचे कर्मचारी आहेत. पुढील दोन दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनेक अधिकारी कर्मचारी यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती कामगार नेते संदीप राणे यांनी दिली.
न्याय मिळवून देणार
मागील अनेक दिवसांपासून मनसे वसई विरार मीरा भाईंदरमध्ये कामगारांच्या हक्कासाठी लढत आहे. आम्ही खोटी आश्वासने देणार नाहीत. हे कर्मचारी ज्या संघटनेत होते त्यांनी आतापर्यंत खोटी आश्वासन दिली, म्हणून आज हे कर्मचारी मनसेत दाखल झाले आहेत. जे शक्य आहे तेच आम्ही करणार. आमची सत्ता आली तर पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. यावेळी मनसे कामगार संघटनेच्या मीरा भाईंदर अध्यक्ष अनू पाटील, कामगार नेते संदीप राणे, सचिन पोपळे, अनिल रनावडे उपस्थित होते.