ठाणे - कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण परिसरात रात्री उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासूनच झोडपायला सुरुवात केली होती. बुधवार सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच दुपारपासून कल्याण पूर्व परिसरातील विजय पाटील नगर तसेच ऑस्टिन नगरसह आडवली -ठोकली या तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कल्याण पश्चिम मधील शिवाजी चौक आणि सहजानंद चौक रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे बरेच हाल झाले आहे. विशेष म्हणजे कल्याण पूर्व परिसरात मोठा नाला नसल्याने पावसाचे पाणी परिसर जलमय झाला आहे.
दरम्यान, कल्याण ग्रामीण मधील पावसाचे पाणी घरात शिरल्याने तब्बल 100 कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यापैकी बरेचसे नागरिक घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहे. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले. नागरिकांना नाला पार करण्यासाठी रस्सी लावण्यात आली होती. मात्र सायंकाळपर्यंत या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.