ठाणे - माझ्या चुलत बहिणीचा साखरपुडा झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे लग्न लांबले आणि जातीव्यवस्था आणि शोषणव्यवस्थेने तिचा बळी घेतला, अशा शब्दांत हाथरसमधील पीडित तरुणीच्या उल्हासनगरमध्ये राहणारा चुलत भाऊ बलवीर वाल्मिकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
हाथरस येथील पीडित तरुणीचा चुलत भाऊ उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात राहतात. ते खासगी वाहन चालक आहेत. पोटापाण्यानिमित्त त्यांचे येथे वास्तव्य आहे. हाथरस येथे त्यांचे चुलता-चुलती राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न झालेले आहे. दुसरी मुलगी अविवाहित आहे. पीडित तरुणी सगळ्यात लहान मुलगी होती. तिचे लग्न ठरले होते. तिचा साखरपुडा पार पडला होता. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केला गेला अन् तिचे लग्न लांबणीवर पडले. जर तिचे लग्न झाले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता, अशी भावना तिच्या चुलत भावाने व्यक्त केली आहे.
माझी ही बहीण शेतात काम करीत होती. आई-वडिलांना हातभार लावत होती. त्या दिवशी शेतात काम करीत असताना अंध जातीव्यवस्थेमुळे मस्तवाल झालेल्यांनी तिला एकटे गाठून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिला जीवे ठार मारण्याच्या हेतूने जखमी केले. ही घटना मला १४ सप्टेंबरच्या रात्रीच माझ्या चुलतीने फोनवरून सांगितली. सहा दिवसांनंतर या घटनेची सविस्तर बातमी टीव्ही चॅनलवर पाहिली, तेव्हा मला सर्व घटना कळली आणि अक्षरश: रडू कोसळले.
पीडित बहीण फारशी शिकलेली नव्हती. गावात आई-वडिलांना शेती व पशुपालनात हातभार लावत होती. गावात वाल्मिकी समाजाची तीनच घरे आहेत. गावात जातीयवाद भयंकर आहे. ठाकूर समाजाकडून मागासवर्गाला तुच्छतेची वागणूक देण्यात येते. त्यामुळे मागास समाज ठाकूर समाजाला कायम भिऊन जगतो. ठाकूर समाजाची टवाळ, मस्तवाल पोरे मागासवर्गीय समाजाच्या मुलींची छेड काढणे, त्यांचा विनयभंग करणे हे प्रकार सर्रास करतात. ज्या तरुणांनी माझ्या पीडित बहिणीवर अत्याचार करून तिला बेदम मारहाण केली त्याच टोळक्याने तिला एकदा शेतात गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या आईला तिच्या प्रतिकाराचा आवाज येताच अतिप्रसंग करणाऱ्यांनी धूम ठोकली होती. हाच राग मनात धरून त्या तरुणांनी तिला १४ सप्टेंबर रोजी शेतात गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार केला, हे सांगताना तरुणीच्या चुलत भावाचे डोळे डबडबले. कोरोनामुळे गावी जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, गावात बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही. माझ्या बहिणीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी माझी मागणी आहे.
दरम्यान, आज पुन्हा पीडितेच्या चुलत भावाशी व तिच्या चुलत काकांशी संर्पक साधण्यासाठी 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे हे त्यांच्या उल्हासनगरमधील धोबी घाट परिसरात राहत असलेल्या घरी मुलाखतीसाठी गेले असता. या घटनेमुळे कुटुंबासह त्यांच्या नातेवाईकांनी काल तहसीलदार कार्यलयावर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी चुलत काकाने योगी सरकारला आव्हान करीत ५० लाख देतो, मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यांनतर मात्र अचानक पीडितेचा चुलता रोशनलाल वाल्मिकी यांची प्रकृती खलावल्याने त्यांना उपचारासाठी मुबंईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंबही घरी नसल्याचे सांगण्यात आले.