ठाणे - भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात पानपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केला जात असताना अन्न व औषध प्रशासन यास आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यातच पुन्हा गुजरात येथून कंटेनरच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेला तब्बल 40 लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.
कंटेनरमध्ये होत्या 100 गुटख्याच्या गोण्या
अन्न व औषध प्रशासनाचे भिवंडी परीक्षेत्राचे सहायक आयुक्त भूषण मोरे यांना आपल्या बतमीदारामार्फत गुजरातहून वाडामार्गे एक कंटेनर भिवंडी परिसरात गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यावर अन्न अधिकारी यांच्या पथकाने भिवंडी-वाडा रस्त्यावर पाळत ठेवून कंटेनर क्रमांक MH 05 AM 3257 हा तालुक्यातील शेलार गावात आला असता त्या ठिकाणी वरील पथकाने अडवून कंटेनरमधील मालाची तपासणी केली. या तपासणी वेळी कंटेनरमधील 100 गोणींमध्ये विमल गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले. या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतून वर्षभरात 11 कोटी 80 लाख रुपयांचा गुटखा जप्त
अन्न व औषध विभागाच्या भिवंडी परीक्षेत्राचे सहायक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑक्टोबर 2019पासून आजपर्यंत विविध ठिकाणी कारवाई करीत तब्बल 11 कोटी 80 लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली आहे.