ठाणे - हिंदू संस्कृतीनुसार मुलगा अग्नी देतो ही परंपरा आहे, मात्र उल्हासनगरमधील एका सावित्रीच्या लेकी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतून मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करण्यात येऊ नये, असा सामाजिक संदेश या माध्यमातून मिळाला आहे.
अनेक वर्षापासून उल्हासनगरमधील मराठा सेक्शन परिसरात श्रीनिवास मल्ला हे पत्नी व दोन मुलीसह राहत होते. त्यांचा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल होता. शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तत्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
मरणापूर्वी श्रीनिवास यांनी माझ्या मरणानंतर मुलीने माझ्यावर अंत्यसंस्कार करावे, अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्या इच्छेनुसार मुलगी श्रुतीनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हिंदू रीतीरिवाजाला ही गोष्ट धरून नसल्याने विरोध होण्याची दाट शक्यता होती. मात्र मुलगी श्रुती हिला याकामी मराठी विभागातील मंडळांनी मदत केली.