ठाणे - शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून यामध्ये मृतदेह बदलण्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. या सर्व प्रकाराला महानगर पालिका जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. पालकमंत्रीदेखील थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेऊन शांत बसले आहेत. याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे, असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारी टाळाटाळ, मृतदेहांची अदलाबदल, ग्लोबल हब कोविड सेंटरमधील अनागोंदी या सर्व प्रकारावर आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला.
रुग्णांची हेळसांड कायम
सध्या शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरू आहे. कोविड सेंटर्समधील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकार्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरीबांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. पालिकेने रुग्णालयातील बिलांसाठी ऑडीटर नेमण्याची घोषणा केली असली, तरिही डिपॉझीट घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेतले जात नाहीय. लाखो रुपयांची बिले दिली जात आहेत. पालिकेने नेमलेल्या नोडल अधिकार्यांमध्ये समन्वय नाही. परिणामी, पालिकेचे पत्र नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत.
पालकमंत्र्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज
म. फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ देण्यासही रुग्णालय प्रशासन तयार नाही. तर, ग्लोबल हब येथे वैद्यकीय अधिकारी मृत रुग्णाला बेपत्ता दाखवत आहे. पालकमंत्र्यांना हे प्रशासन चुकीची माहिती देत आहेत. एकंदर पालकमंत्र्यांना गंडवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकार्यांकडून सुरू असून त्यामुळे नाहक सरकारला बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केले, तरच या शहरातील महामारी आणि प्रशासकीय अधिकार्यांची मुजोरी संपुष्टात येईल, असे परांजपे यांनी म्हटले आहे.