ठाणे - वाढदिवसाच्या दिवशी हातात तलवार घेऊन फोटोसेशन करणे एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. विशेष म्हणजे या माजी नगरसेवकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.
कल्याण तालुका पोलिसांनी व्हिडिओ आणि फोटो पाहून त्या माजी नगरसेवकावर आर्म एक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे महाशय सध्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही आहेत. मयुर पाटील (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.ते कल्याण डोंबिवली महापालिका बल्याणी प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे.
मयुर पाटील यांचा मंगळवार 16 जुलै रोजी वाढदिवस होता. सोमवारी रात्रीच मयुर पाटील यांनी आपल्या साई आशीर्वाद बंगल्यावर समर्थकांसह मध्यरात्री केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांना भेट म्हणून आलेली तलवार आपल्या हातात घेऊन उंचावून इतरांनाही दाखवत असल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले. या प्रकरणाची कल्याण तालुका पोलिसांनी चौकशी सुरू करून अखेर माजी नगरसेवक मयुर पाटील यांच्यावर आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी मयुर पाटील यांच्याकडून ती धारदार तलवार जप्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी याच बल्याणी गावात शिवसेना शाखाप्रमुख नफीस रईस व भाजपा युवा पदाधिकारी सर्फराज उर्फ मुन्ना रईस यांनीदेखील त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळीही कल्याण तालुका पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले होते.