ठाणे : कल्याण रेल्वे स्थानक ( Kalyan Railway Station ) परिसरात व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी स्थानिक भाजपच्या माजी नगरसेवकाने एका व्यावसायिकाला ५ लाखाची खंडणी मागणी ( Ex BJP Corporator Demanding Ransom ) होती. मात्र खंडणी देण्यास नकार दिल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाने पाच साथीदारांशी संगणमत करून एकाच्या पोटात चॉपर भोसकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात ( Mahatma Fule Chowk Police Station ) माजी नगरसेवकासह ६ जणांच्या टोळीविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
माजी नगरसेवकावर 2 दिवसांत लागोपाठ 2 गुन्हे दाखल
सचिन खेमा ( Crime Registered Against Sachin Khema ) असे या भाजपाच्या माजी नगरसेवकाचे नाव असून, त्याच्याविरोधात 2 दिवसांत लागोपाठ 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नितीन खेमा, प्रेम चौधरी, सतेज पोकळ उर्फ बाळा, बबलू शेख, सचिन खेमा आणि अन्य एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी सचिन खेमा हा कल्याण पश्चिमेच्या मार्केट परिसरातील भाजपाचा माजी नगरसेवक आहे. या संदर्भात मुरबाड रोडला मुरार बागेतील मोरे चाळीत राहणारा व्यापारी अमजद सय्यद (31) याच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 307, 387, 120 (ब),143, 147, 148, 149, 324, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी माजी नगरसेवकाने दिली धमकी
तक्रारदार अमजद सय्यद याचा मित्र भूषण जाधव याने याच पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक सचिन खेमा याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी, तसेच अमजद सय्यद याचा कल्याण रेल्वे परिसरात असलेला छत्री व पतंगाचा धंदा यापुढे चालू ठेवण्याकरिता नगरसेवक सचिन खेमा याला 5 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर यापुढे तू कसा जगतो, अशी धमकी दिली व्यवसायिकाला दिली होती.
अन् अमजदच्या पोटात चॉपर खुपसला
दरम्यान, व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिला. 6 जणांनी मिळून बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील सुभाष चौकातील फुटपाथवर अमजद सय्यद याला गाठले. त्याच्या समवेत त्याचा मित्र चेतन शेट्टी आणि शहाबाज मुलानी असे दोघे होते. धमकी दिल्यानंतर ते दोघे मित्र पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला निघाले. हे पाहून माजी नगरसेवक सचिन खेमा याच्या चिथावणीवरून त्याच्या साथीदारांनी कट-कारस्थान रचले आणि अमजदच्या पोटात चॉपर खुपसला. तसेच प्रेम चौधरी यानेही हातावर चॉपरने वार करून अमजदला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हल्लेखोर टोळीचा शोध सुरु
अमजदला वाचवण्यासाठी मधे पडलेला त्याचा मित्र शहाबाज मुलानी याच्या हातावरही सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात अमजद आणि त्याचा मित्र शाहबाज असे दोघे गंभीर जखमी झाले. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी अमजद व शहाबाज यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. जखमी दोघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.