ठाणे - गणपती उत्सव अवघ्या तासांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. त्यातच गणपतीच्या आगमनाने कल्याणच्या फूल मार्केटमध्ये फुलांचा भाव चांगलाच वधारल्याचे पाहवयास मिळाले. विशेष म्हणजे कोरोनाची भीती विसरून नागरिकांची फुले खरेदीसाठी सकाळपासूनच झूबंड उडाली आहे. मात्र यावर्षीच्या गणपती उत्सवाला महागाईची झळ बसली आहे. यामुळे नागरिकांच्या आर्थिक चिंता वाढल्या असून गणपतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत.
पर्यावरणपूरक नैसर्गिक आरास सजावटीला महत्त्व -
कोरोना आटोक्यात येऊ लागल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अजूनही आर्थिक घडी बसली नाही. त्यात पेट्रोल, डिझेल, घरगुती गस, बरोबर खाद्य तेलाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. यावर्षी शासनाकडून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सणावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यामुळे घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक आरास सजावटीला विशेष महत्व दिले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणत वेगवेगळ्या फुलांची मागणी होत असते. या काळात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री केली जाते.
फूल विक्रेत्यांना यावर्षी काही दिलासा -
दीड दिवसांचे आणि पाच दिवसांच्या गणपतीची संख्या वाढल्याने फुलांची मागणी वाढली आहे. गणपतीच्या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, गुलाब, शेवंती, याच बरोबर परदेशी आर्केड, जरबेरा, कार्नेशियन, जीडाली, डेझी अशा फुलांची मागणी सुद्धा वाढली आहे. पण मागील दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर बाजार खुलले असल्याने ही फुले बाजारात उपलब्ध होत आहेत. पण त्यांच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. थर्माकोल आणि पीओपीच्या सजावटी पेक्षा नैसर्गिक सजावटीकडे नागरिकांचा कल असल्याने फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी मागणी होत आहे. मागील दोन वर्षांपासून फुलविक्रेते मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. यावर्षी काही दिलासा मिळाला आहे. त्यात वाहतुकीचा, मजुरीचा खर्च वाढला असल्याने फुलांच्या किंमती वाढल्या असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
'असे' होतो फुलांचे दर -
झेंडू ८० ते १०० रु.किलो, गुलाब २०० ते २२५ रुपये, शेवंती १५० ते १८० रुपये किलो, मोगरा ९० ते १२० किलो, डेझी ३० ते ५० रुपये जुडी, अस्टर ३० ते ४०, कार्नेशियनल १६० ते १८० रुपये १० फुले, जीडाली ११० ते १२० रुपये १० फुले, आर्केड ९०० ते १००० रुपये १० फुले, जरबेरा ८० -१०० रु. १० फुले
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास