नवी मुंबई - खाडी किनारी फ्लेमिंगोचा मोठ्या प्रमाणात मूक्त संचार पाहायला मिळत आहे. पूरक पोषक व सकारात्मक गोष्टींमुळे नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षांची संख्या दुप्पट तिप्पट वाढली आहे. मूळचा परदेशी असलेला मात्र कच्छमध्ये स्थिरावलेल्या फ्लेमिंगो पक्षांमुळे नवी मुंबईतील, ऐरोली खाडीकिनारी असलेल्या होल्डिंग पौंडवर या पक्षांची गुलाबी चादर परसलेली पाहायला मिळते आहे. हे पक्षी पाहण्यासाठी बोटीतून फ्लेमिंगो सफरीला सुरवात झाली आहे.
फ्लेमिंगो जून जुलै व सप्टेंबर महिन्यात आढळतात कच्छमध्ये -
नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर फ्लेमिंगोचा वावर पाहायला मिळतो. फ्लेमिंगो जून जुलै व सप्टेंबर महिन्यात कच्छमध्ये आढळतात. मात्र, विणीचा हंगाम आटोपला की, नवी मुंबई परिसरात येतात. मुंबई शिवडी, ठाणे व नवी मुंबईत त्यांचा अधिवास असतो. इतर वेळी नवी मुंबईत फ्लेमिंगो पाहायला जरी मिळात असले तरी त्याचे प्रमाण मात्र तुरळक होते.
असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात ठिकठिकाणी गुलाबी छटा -
नवी मुंबईतील खाडी परिसरात गुजरातच्या कच्छ किनाऱ्यावरून रुबाबदार आणि दिमाखदार दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे म्हणजे फ्लेमिंगोंचे मोठ्या संख्येने आगमन होते. जानेवारी महिन्यात त्यांच्या असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात ठिकठिकाणी गुलाबी छटा डोळे दिपवून टाकत आहे.
ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी बोटीतून खाडीतून फ्लेमिंगो सफारी सुरू केली आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोची संख्या वाढली असल्याने पक्षीप्रेमी यांचा खाडीसफरीकडे कल वाढला आहे. नवी मुंबईतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात शहरातील नागरिक केंद्राला भेट देत आहेत.
ऐरोलीत २६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षांचे स्थलांतर -
नवी मुंबईतील ऐरोलीत २६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनाऱ्यावर दरवर्षी आश्रयाला येतात. यात पेटंट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी परदेशी पक्ष्यांचा समावेश आहे हे पक्षी पाहण्यासाठी बोटिंग सफारीची सोय आहे ही माहिती सुदाम गांगुर्डे,वन अधिकारी ऐरोली यांनी दिली.