ठाणे : लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांनी गिर्यारोहकांनी गिर्यारोहणाचे नियोजित उपक्रम रविवारपासून पुन्हा राबवण्यास सुरूवात केली आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या, मात्र गिर्यारोहणासाठी अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हरिश्चंद्रगड सर करणाऱ्या डोंबिवलीच्या काव्या नाईक या चिमुरडीच्या साहसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
फाऊंडेशनने ९ वर्षाच्या चिमुरडीच्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक चित्तथरारक भैरवगड निवडून रविवारी पुन्हा धाडसी गिर्यारोहणाचा उपक्रम राबविण्यात आला. सरकारी नियमानुसार 15 जणांचा सहभाग अनिवार्य होता. त्यामुळे फाऊंडेशनने 9 जणांचा समूह तयार केला. विशेष म्हणजे या समूहात 9 वर्षाच्या लहान चिमुरडीचाही सहभाग होता. काव्या प्रशांत नाईक असे या चिमुरडीचे नाव असून ती डोंबिवलीत राहणारी आहे. या लहान मुलीचा तिचा आयुष्यातील पहिलाच ट्रेक चित्तथरारक होता. गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव नसताना या चिमुरडीला घेऊन गड सर करणे हे फाऊंडेशनसाठी आव्हानच होते.
शनिवारी रात्री गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही वस्तीला थांबून सकाळी पहाटे गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. भैरवगड सर करण्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन तास लागतात. पहाटेच्या सूर्य नारायणाच्या पहिल्या किरणांचे दर्शन घेत गिर्यारोहक भैरवगडाच्या सुळक्याच्या पायथ्यापाशी पोहचले. पुढे असलेला काताळ सुळका सर करण्यात मोठी कसरत होती. भैरवगड हा माळशेज भागातील सर्वात रोमांचकारी ट्रेक आहे. शिवकालीन नाणेघाट-जीवनधन व्यापार आणि कल्याण-जुन्नर व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी ही एक मोक्याची जागा मानली जाते. भैरवगडाच्या शिखरावर जाण्यासाठी जंगलातून मार्ग काढत पुढे जावे लागते. पठारावर पोहोचल्यावर विशाल झाडाखाली छोटेसे भैरवनाथ मंदिर दिसते. भैरवगडाचा काताळ दगडाचा सुळका सर करत असताना पुरातन पायऱ्या आहेत. त्यामुळे सुळक्यावर चढताना चांगलीच कसरत करावी लागली.
इंग्रजांच्या काळात बऱ्याच गडकोट किल्ल्यांची नासधूस करण्यात आली. त्याचप्रमाणे या किल्ल्याच्या पायऱ्या तोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुळक्यावर चढताना चांगलीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीही काव्या नाईकने इतर गिर्यारोहकांबरोबर हरिश्चंद्रगडावर झेंडा रोवला. या पर्वतावर पोहोचल्यानंतर अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड, रोहिडा, नाणेघाट, जीवधन या गडकोटांचे तिला जवळून दर्शन घेता आले. त्यामुळे या चिमुरडीचे डोंबिवलीकरांकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही पर्वत-गड-किल्ल्यांवर चढ-उतार करताना नवख्या गिर्यारोहकांनी ट्रेकिंगच्या उपकरणांचा आधार घेणे आवश्यक असल्याचे हँग्री ट्रॅकर्स फाऊंडेशनचे आशु कापडोस्कर यांनी सांगितले.