ठाणे - मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या धावत्या डेक्कन एक्सप्रेससमोर आपल्या मुलासह ( Father jumps in front of a train with his son ) उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली आहे. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी मात्र सहा वर्षाचा चिमुरडा सुखरूप बचावला आहे. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
उल्हासनगरच्या शांती नगर परिसरात प्रमोद आंधळे आपली पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. प्रमोद बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतक प्रमोद आंधळे हे आपला सहा वर्षाचा मुलगा स्वराजसह बुधवारी सायंकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास ते विठ्ठलवाडी स्थानकात आले. त्यानंतर विठ्ठलवाडी स्थानकात ट्रेन येण्याची त्यांनी वाट पाहत असतानाच मुंबईहुन पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्स्प्रेस येत असल्याचा अंदाज घेऊन लहान मुलाच्या हाताला धरून त्यांनी रेल्वे रुळावर उडी मारली. त्यावेळी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वराजला बाहेर काढले. तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात रवाना करून प्रमोद यांनी आत्महत्या का केली, याचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.