ठाणे - मुंबईत 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने केली होती. त्याच धर्तीवर ठाण्यातही 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन 2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आले होते. परंतु त्याची पुर्तता अद्यापही झालेली नाही.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे असल्याने हा मार्ग तसा सुकर आहे. मात्र, उध्दव ठाकरे ठाण्याला दिलेले हे आश्वासन पूर्ण करणार का, हे पाहणे महत्वाचे आहे. यातच आता मनसेनेही ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, यासाठी महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन दिले आहे.
हेही वाचा... राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, अंमलबजावणीला शिवजंयतीचा मुहूर्त
त्यामुळे याबाबत शिवसेना आपले वचन पूर्ण करून दाखवते का नाही, असा सवाल मनसेने केला आहे. याबाबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी, यात विशेष काही नाही. लवकरात लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याविषयी निर्णय जाहीर करतील, असे सांगितले आहे.