ठाणे - अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या एका लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला उभी असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हितेंद्र राजभर, असे शीर आणि धड आढळून आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास एका लोकलमधील लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली. याच दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्तीचे धड पोलिसांना आढळले. या संबंधी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे समोर आले आहे.
हत्या नसून रेल्वे अपघात-
मृत हितेंद्र उल्हासनगर स्थानकावरून मध्यरात्री १२.२० च्या शेवटच्या लोकल मध्ये चढला होता. यावेळी तो दरवाजात उभा असतांना त्याचे डोके रेल्वे रुळाजवळील असलेल्या खांबाला आदळले. यात त्याचे शीर लोकलच्या डब्यात राहिले आणि धड उल्हासनगर स्थानका जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते, अशी माहिती रेल्वे सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. ही हत्या नसून रेल्वे अपघात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा- फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार