ठाणे - टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होवून नागरिकांना त्रास होवू नये, याकरता वाहनांना फास्टॅगची सक्ती करण्यात आली आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते ठाण्यात बोलत होते.
'वाहतूककोंडी होणार नाही'
टोल नाक्यावर वाहनांकडून टोल घेताना लांबच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांचा नाहक वेळ वाया जातो. जर फास्टॅग प्रत्येक वाहनांना लावले गेले, तर टोल नाक्यावर वाहतूककोंडी होणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचतदेखील होईल आणि टोल नाक्यांवर वसूल केल्या जाणाऱ्या पैशांची मोजदाद करणेदेखील सोयीस्कर होईल. त्यामुळे प्रत्येक गाडीवर फास्टॅग असणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जनजागृतीही केली जाणार
१ जानेवारी २०२१पासून विना फास्टॅग लावलेल्या गाड्या टोल लेनवरून गेल्या तर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. १५ डिसेंबरपासून सर्व टोल नाके कॅशलेस होणार असले, तरीही कॅश लेनही सुरू राहतील. मात्र त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. खासगी बँका, पेमेंट अॅपद्वारेदेखील फास्टॅग मिळवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच आता प्रत्येक टोल नाक्यावर टोल चालकांमार्फत फास्टॅग काढण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असून त्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे.
'अंदाजे ५० टक्के गाड्यांनीच लावले होते फास्टॅग'
मुंबईतील टोल नाके असो की एक्स्प्रेस वेवरील टोल नाके. सर्वच ठिकाणी टोल नाक्यांवर टोल वसुलीमुळे मोठी वाहतूककोंडी होत असते. यामुळे वेळ आणि इंधन तर वाया जातेच, पण पर्यावरणाचादेखील ऱ्हास होतो. त्यात विनाकारण हॉर्न वाजवून अनेक वाहनचालक ध्वनी प्रदुषणही करतात. तर टोलवरून वाहनचालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी, धक्काबुक्की आणि शिवीगाळ असे प्रकार वाढतच जात आहेत. हे सर्व टाळण्यासाठी गेली वर्षभर फास्टॅग सक्तीचे करण्यात आले होते. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावरून जाणाऱ्या एकूण गाड्यांपैकी अंदाजे ५० टक्के गाड्यांनीच फास्टॅग लावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जोपर्यंत फास्टॅग सक्ती केली जात नाही, तोपर्यंत टोल नाक्यावरील वाहतूककोंडी कमी होणार नाही. हाच हेतू लक्षात घेवून आता सर्व गाड्यांना फास्टॅग सक्तीचे केले गेले आहे.