ठाणे - पावसामुळे राज्यभरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता शेतमालावर दिसू लागला आहे. शेतमालासोबत आता इतर वस्तूंचे देखील भाव वाढले आहेत. कांदा आणि बटाटानंतर आता अंड्यांचेदेखील भाव गगनाला भिडले आहेत. ट्रान्सपोटेश, डिझेल, पेट्रोलचे दर वाढत असून, दुसरीकडे मालाची देखील कमतरता आहे. त्यामुळे अंड्यांचे भाव वाढले आहे, असे होलसेलर व्यापारी आणि दुकानदारांनी सांगितले आहे.
अंड्यांमागे 1 रुपये प्रति भाव वाढले आहेत. याआधी 1 डझन अंड्यांची किंमत 60 रुपये होती. तीच अंडी आता 70 रुपये डझनने विकली जात आहे. तर, आधीचे शेकड्याचे (100 अंडी) दर 450 रुपये होते. तेच आता 550 रुपये शेकडा झाले आहेत.
हेही वाचा - पोलीस मुख्यालयाच्या आवारातच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हाणामारी
दुसरीकडे गावठी अंड्यांचे दर 150 रुपये डझन असून, यामध्ये वाढ झालेली नसल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. अशीच अंड्यांची कमतरता जाणवली तर अजून भाव वाढण्याची शक्यता दुकानदारांनी वर्तवली आहे. महागाई वाढली, पावसाच्या प्रमाणामुळे शेतमाल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे पुरवठा कमी असल्याने मागणी कायम आहे. यामुळे दरवाढ झाली आहे.