ठाणे - दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती अस्त्र-शस्त्रांची पूजा करून आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. ठाण्यातील पोलीस दलात देखील दसऱ्याची फार मोठी परंपरा आहे. ड्युटीनिमित्त दिवसातील बारा ते चौदा तास घराबाहेर राहणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना आपले पोलीस दल म्हणजे दुसरे कुटुंब आणि पोलीस आयुक्त म्हणजे या कुटुंबाचे प्रमुख वाटतात. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील पोलीस बांधवानी एकत्र येत पोलीस मैदानात शस्त्र पूजेचे आयोजन केले होते.
पोलिसांनी आपल्या गाड्या, आपले हेल्मेट, फायबर बॅटन, बंदुका आणि इतर वस्तूंचे मनोभावे पूजन केले. या कार्यक्रमाला नुकतेच नवीन पोलीस आयुक्त म्हणून आलेले जयजीत सिंग हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मानवंदना स्वीकारली व सर्वांनाच आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील आपल्या अधीक्षक कार्यालयाबाहेर शस्त्र पूजन केले. कोरोनाशी यशस्वी झुंज देणाऱ्या पोलीस बांधवांनी यंदा शस्त्र पूजा केली. या संपूर्ण कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले होते.