ठाणे - कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे रेडिओलॉजी विभाग बंद होण्याची शक्यता असून गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.
कळव्याचे छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दरदिवशी शेकडो गरजू रुग्ण येत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत असून त्याला डेंग्यूचे डास कारणीभूत आहेत. दरम्यान, रुग्णालयात रेडिओलॉजी विभागात दोन वरिष्ठ डॉक्टर आणि सहा शिकाऊ डॉक्टरांचे पथक कार्यरत असते. या विभागात गरोदर स्त्रिया मोठ्या प्रमाणात येत असल्याने या विभागाची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवरच असते. परंतु गेल्या काही दिवसापासून या विभागातील पाच डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरांच्या गैरहजेरीत हा विभाग तात्पुरता बंद करावा लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना विचारले असता, त्यांनी परिस्थिती एवढी गंभीर नसून काही डॉक्टर कामावर हजर झाले आहेत अशी दिली. डेंग्यूला रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषध फवारणीचे काम सुरु असून मच्छरांची पैदास कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले.