ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने मंत्रिमंडळाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त केलेल्या समितीने ऐतिहासिक निर्णय घेऊन झोपडीधारकांना दिवाळी भेट दिली आहे. यापुढे निष्कासनानंतर अवघ्या पाच वर्षांत झोपडी विकता येणार आहे. तसेच, सन 2011 नंतर बांधलेल्या झोपड्यांनाही आता संरक्षण मिळणार असून अवघ्या अडीच लाखात या झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे.
झोपडीधारकांना दिवाळी भेटच; 2011नंतरच्या झोपडीधारकांना अडीच लाखात पक्के घर मिळणार सहा महिण्यापूर्वी केली होती घोषणा -सहा महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत पुनर्विकास योजनेत समाविष्ट असलेल्या झोपड्या निष्कासनानंतर पाच वर्षात विकण्याची मुभा देण्याबाबत सुतोवाच केले होते. त्यांनी मांडलेल्या या विषयाला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
समितिच्या मार्फत घेतला निर्णय -या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, नवाब मलिक, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश होता. या समितीच्या बैठकीत हे निर्णय घेऊन झोपडीधारकांना दिवाळी भेट दिली आहे. या आधी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाल्यानंतर ती विकण्यासाठी दहा वर्षांची वाट पहावी लागत असे. त्या निर्णयात बदल करून आता झोपडी पाडलेल्या दिवसांपासून पाच वर्षातच झोपडीधारकांना आपली झोपडी विकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तर, या आधीच 2011 नंतर बांधलेल्या झोपड्यांना पैसे भरून पक्के घर देण्याचा कायदा आहे. त्यासाठी आता केवळ अडीच लाख रूपये भरून घर मिळणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे गोरगरीब झोपडीधारकांच्या अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा - बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी