ठाणे - कोरोनाला घाबरून आपल्या मूळ गावी हजारो परप्रांतीय नागरिक मुंबई- नाशिक महामार्गावरून पायी प्रवास करत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांची होणारी गैरसोय पाहून रमाबाई ब्रिगेड महिला संघटना सामाजिक या भयभीत झालेल्या नागरिकांना धीर देत गेल्या दहा दिवसांपासून अन्नदान वाटप करत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. यामुळे हाताला काम नसणारे लोक या भीषण आजाराला घाबरून भीतीने गोवा, मुंबई, अलिबाग येथून हजारो परप्रांतीय कामगार आपल्या कुटुंबासह मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरून पायी प्रवास करून आपल्या मूळगावी नाशिक, नागपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जात आहेत.
मात्र, सर्वत्र बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होऊन भुकेने व्याकुळ झालेले हे नागरिक त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुले, महिला, वृद्ध यांचाभूकबळी होऊनये म्हणून २३ मार्च पासून रमाबाई ब्रिगेड महिला संघटना अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी या परप्रांतीयांना मोफत अन्नदान सुरू करून एक मदतीचा आधार दिला आहे. हे त्यांचे कार्य जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तो पर्यंत अविरत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती भगवान गायकवाड यांना अन्न वाटप करतेवेळी एक महिन्याचे बाळ एका कुटुंबाकडे दिसले हे कुटंब मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी निघाले होते. या कुटुंबांना त्यांनी सांगितले कि, कुठेही जाऊ नका, आहात तिथेच थांबा. सरकार आपल्याला अन्नधान्य पुरवणार आहे. मात्र, असे सांगून सुद्धा हे कुटुंब ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याचे त्यांना दिसून आले. कोरोनाला घाबरून जी लोकं शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून जात आहेत. त्यांना कशाप्रकारे समजवावे हेच कळत नसल्याचे त्यांनी हताश होऊन सांगितले.