ठाणे - मोदी सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे बहुजनांचे मंत्रिमंडळ असून, सर्वात जास्त ओबीसी मंत्री मोदी सरकारमध्ये आहेत. परंतु, राज्य सरकारने ओबीसींच्या कल्याणासाठी काही केले नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली. तसेच ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाणे कोकण विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने आज देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री कपिल पाटील ठाण्यात आले होते.
ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचे मारेकरी -
ठाकरे सरकार हे ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असून, या सरकारने ओबीसी समाजावर कशाप्रकारे अन्याय केला आहे याची माहिती सर्वांना दिली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. या सरकारमध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय जेवण जात नाही, असा टोला फडणवीस यांनी मह विकास आघाडीतील नेत्यांना लगावला. भाजप सरकारने ओबीसी समाजासाठी बनवलेल्या सर्व योजना या सरकारने बंद केल्या व यांच्या करंटेपणामुळे ओबीसी आरक्षण बंद झाले. त्यामुळे अशा खोटं बोलणाऱ्यांचा बुरखा जनतेसमोर टराटरा फाडून जनतेसमोर उघडे पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
कोविड नियमांचे उल्लंघन -
या कार्यक्रमात सर्व नेते, कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले आहे. बिना मास्क नेत्यांनी भाषणे केली. अशावेळी गर्दी करून कोविड नियमांना हरताळ फासला. एकीकडे सरकार शाळा उघडताना कोविड नियमांवर भर दिला आहे. अशावेळी या कार्यक्रमात होणारे नियमांचे उल्लंघन कोविडचा प्रादुर्भाव वाढवणारे आहेत.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारांनी अमित शाह यांची घेतली भेट