ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात होत असलेल्या मृत्यूचा आकडा आणि महापालिकेच्या नोंदीतील संख्या यात मोठी तफावत आढळून आल्याने ही लपवाछपवी का केली जात आहे. असा सवाल उपस्थित झाला होता. याबाबतच्या वृत्ताचे खंडन करताना ठाणे मनपा उपायुक्त संदीप माळवी यांनी हे खरे नसल्याची सारवासारव केली आहे.
स्मशानभूमीतील आकडे सरसकट असून अधिकचे मृत्यू हे कोविड संशयितांचे असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या दैनंदिन नोंदीत दररोज आढळणारे रुग्ण कोविड पॉजिटीव्ह घोषीत केले जात असताना मृत्यू मात्र कोविड संशयितांचे दाखवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीतील मृतांचे आकडे सरसकट-
ठाण्यातील जवाहर बाग, वागळे इस्टेट आणि कळवा स्मशानभूमीत मागील (५ ते ११ एप्रिल) आठवडयाभरात २३५ जणांवर अंत्यसंस्कार झाले. या कालावधीत ठाणे मनपाच्या नोंदीत अवघे ३९ जणांचाच कोविडने मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या लपवाछपवीवरून मोठा गदारोळ उठल्यानंतर पालिका प्रशासन हादरले. अखेर,पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी स्पष्टीकरण देत यात तथ्य नसल्याचा दावा केला. ठाणे महापालिकेच्यावतीने कोविडच्या मृत्यूची रुग्णसंख्या लपवली जात असल्याची चर्चा खरी नाही. स्मशानभूमीतील मृतांचे आकडे सरसकट आहेत. त्यामध्ये कोविड रुग्णाच्या मृत्यूची संख्या आणि कोविड संशयित मृत्यूची संख्या ही वेगवेगळी आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात असल्याची सरसकट आकडेवारी घेतली जात आहे. जे कोविडमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. ते मनपा प्रशासन जाहीर करत आहे. स्मशानभूमीत संशयित मृतदेहावर आयसीएमआरच्या प्रोटोकॉलप्रमाणेच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे, मृत्यूंच्या लपवाछपवीत तथ्य नसल्याचे माळवी यांनी म्हटले आहे.
पालिकेचा खोटेपणा?-
दरम्यान,पालिकेच्या म्हणण्यानुसार अधिकचे मृत्यू कोविड संशयितांचे असतील तर, दररोज पॉजिटीव्ह आढळणारे रुग्ण कोरोनाचे कसे? मृत्यू पावलेल्या संशयित रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली का? या चाचणीत कोविडचे निदान झाले असतानाही मृत्यूनंतर ते रूग्ण कोविड संशयित कसे?, असा सवाल नागरीक करीत आहेत.
हेही वाचा- सीबीएससीची दहावीची परिक्षा रद्द; तर बारावीची परीक्षा लांबणीवर