ठाणे - कल्याण-भिवंडी रोडवरील राजनोली नाका येथील टाटा आमंत्रण येथे अलगीकरण केंद्राच्या इमारतीवरून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना काल (रविवार) घडली होती. या घटनेमुळे येथील हजारो रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून कोरोनाबाधित रुग्णाची ही आत्महत्या होती की हत्या, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. तसेच या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्री आणि गृहमंत्र्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली. सदर ठिकाणी पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सोमैया यांनी हि मागणी केली.
तसेच सरकार कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोपही किरीट सोमैया यांनी केला आहे. सोमैय्या हे आज (सोमवार) अन्य भाजपा नेत्यांसह या अलगीकरण केंद्राच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
हेही वाचा - दु:खाचा डोंगर..! अवघ्या 9 दिवसात सख्ख्या तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू
भिवंडी तालुक्यातील राजनोली नाका येथील टाटा आमंत्रण या ठिकाणी जिल्हा अलगीकरण केंद्राची इमारत आहेत. या ठिकाणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड येथील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यामध्ये डोंबिवलीतील एका 43 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी १७ जुलैला दाखल केले होते. मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास या रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आज (सोमवार) दुपारच्या सुमाराला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश चौगुले भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी टाटा आमंत्रण सेंटरमधील घटनास्थळाला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या सर्वांशी चर्चा केली आणि येथील दुर्घटना आत्महत्या की हत्या, याचा शासनाने गांभीर्याने विचार करून यास जबाबदार आरोग्य मंत्री व गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
क्वारंटाईन सेंटर असणाऱ्या ठिकाणी करोनाची लागण झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या अतिनिकट संपर्कात आलेल्या संशयित रुग्ण या आजाराच्या धसक्याने खचून जात असल्याने त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मानसोपचार तज्ञांची गरज आहे. अशा ठिकाणी मानसोपचार तज्ञ यांची तात्काळ नेमणूक करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, असे किरीट सोमैया यांनी सांगितले.