ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली महत्वाची विकास कामे प्रकल्प बंद करण्याचा इशारा पुन्हा एकदा ठाण्यातील ठेकेदारांनी दिला आहे. किमान जुन्या कामाची बिले तरी ठाणे महापालिकेने काढावी, अशी मागणी 180 ठेकेदारांनी केली आहे. जवळपास 700 ते 800 कोटींची थकबाकी ठाणे महापालिकेकडे असून कुटुंब चालवणे देखील कठीण झाले असल्याने काहींनी आत्मदहणाचा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने बिले स्वीकारणेच ठाणे महापालिकेने बंद केले आहे. शहरात ठेकेदारांच्या माध्यमातून अनेक महत्वाची कामे सुरू असून केलेल्या कामांची बिलेच मिळत नसल्याने कामगारांना पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने काम करणे देखील कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बिले निघत नसल्याने ठेकेदारांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. मात्र अद्यापही बिल अदा न झाल्याने आज पुन्हा ठेकेदारांनी आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ठेकेदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली असून माळवी यांनी आयुक्तांसोबत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. ठेकेदारांनी खरंच कामे बंद केली तर शहरातील परिस्थिती मात्र बिकट होण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा -लेटरवॉर.. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले राज्यपालांची 'ही' कृती संसदीय लोकशाहीला मारक
ठेकेदार थकीत बिलामुळे त्रस्त -
ठाण्यात महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मागील दोन वर्षांपासून बिघडलेली आहे. त्यामुळे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार ही देता येत नाही. त्यामुळे बँकेत असलेल्या ठेवी मोडून पगार दिला जात आहे. आता त्यात विकासकामे सुरू असल्याने त्यांची बिले कशी द्यायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी पालिकेला उत्पन्न वाढवावे लागणार आहे.