ठाणे - राज्यासह देशभरात विविध राजकीय पक्षासह महागाईचा आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांचे इंधन व गॅस दरवाढी विरोधात आंदोलने सुरू आहेत. यातच भर पडली आहे ती देशव्यापी बांधकाम विकासकांच्या संघटनेच्या आंदोलनाची. सिमेंट आणि लोखंडच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम थेट सदनिका विक्रीवर झाला आहे. लोखंडच्या दरवाढीचा फटका बसल्याने आम्ही दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारल्याचे बिल्डर एसोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरींची मध्यस्थी फेल -
गेल्या काही महिन्यापूर्वी बिल्डर एसोशियन ऑफ इंडिया या संघटनेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सिमेंट व लोखंड दरवाढ कमी करावेत म्हणून चर्चा केली होती. त्यांनतर गडकरी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन दरवाढ कमी करण्यासाठी बांधकाम विकासकांचे म्हणणे मांडले होते. मात्र, बरेच महिने उलटून गेले तरीही मोदी सरकारकडून या विषयावर निर्णय दिला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरींची मध्यस्थी फेल गेल्याचे बांधकाम विकासक अमित चंदनानी यांनी सांगितले. शिवाय कोरोनाच्या काळातही बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहेच, त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारने सिमेंट आणि लोखंडचे दर कमी करून आमच्यासह नवीन घरे घेणाऱ्याना दिलासा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलन -
देशभर सिमेंट व लोखंडाच्या दरवाढी विरोधात बिल्डर एसोशियन ऑफ इंडिया या संघटनेचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरु आहे. त्याच पार्शवभूमीवर उल्हासनगर, अंबरनाथ , बदलापूर परिसरातील बांधकाम विकासकांनीही उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी सिमेंट आणि लोखंडच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत दरवाढ कमी करावी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दरवाढीचा निषेध केला.