ठाणे - ठाणे ( Thane highway )आणि मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग जोडणारा महत्वाचा पुल म्हणजेच कोपरी पुल ( Kopri Bridge ) या पुलाच उद्घाटन 1 वर्षापूर्वी ठाण्याचे पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी अतिशय योग्य आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याचप्रमाणे या पुलामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, अशीही ग्वाही दिली होती. मात्र हे दोन्ही दावे आता फेल ठरले आहेत. पावसाच्या ( Rain ) जोर कायम असताना याच कोपरी पुलाने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. या पुलावर मोठ- मोठे खड्डे पडले असून यामुळे ठाणेकर तसेच मुंबईतून ठाण्यात येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीचे कारण - ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती मुंबई ठाण्याला जोडणारा कोपरीचा पूल राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन ( Municipal Corporation ) आणि रेल्वे प्रशासन या तिन्ही यंत्रणांच्या वेळ काढूपणामुळे 20 वर्ष उशिराने बांधण्यात आला. आता या पुलाचं काम अर्धवट असताना आपुल वाहतूक कोंडीचा एक मोठं कारण बनला आहे. मुंबईपासून ठाण्याला यायला 40 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आनंदनगर टोल नाका क्रॉस करून, कोपरी ब्रिज उतरायला तासभराचा कालावधी लागत आहे. यामुळेच प्रवासी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. याला मुख्य कारण रस्त्यावरचे खड्डे आणि निमुळता रस्ता झाल्यामुळे होत आहे.
कोपरी पुलाचा इतिहास - 10 ऑक्टोबर 2021 मध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. बांधकाम होऊन देखील अनेक महिने या मार्गिकाचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. कारण मनसेने या ब्रिजला तडे गेल्याचे उघडकीस आणून आंदोलन केले होते. त्यानंतर आयआयटीमार्फत पुलाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी रेल्वे मार्गावरून जाणारा 4 मार्गिकेचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने 1958 साली उभारला. त्यालाच कोपरी ब्रिज असे नाव पडले.
ठाणे आणि मुंबई शहराचा विकास - वाहतूक वाढल्याने 1995 नंतर एमएमआरडीएने पुलाच्या बाजूला 2 मार्गिका वाढवल्या. मात्र, त्यानंतर ठाणे आणि मुंबई शहराचा प्रचंड विकास झाला. त्यामुळे फक्त 4 मार्गिकेचा असलेला कोपरी ब्रिज वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला. त्यात 22 जून 2017 ला रेल्वेवरील ब्रिज आयआयटीच्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाली आणि 258 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. अखेर 21 मे 2018 ला या पुलाच्या पुनर्निर्माण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 1958 साली बांधलेला जुना कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूल निर्माण करण्यात येईल. मात्र, त्याचे बांधकाम नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. असे असले तरी अधिकच्या 4 लेन उपलब्ध झाल्याने कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही.
बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न - या पुलाच्या कामाबद्दल सुरुवातीपासूनच अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. या कामाचा दर्जा हा योग्य नसल्यामुळे या पुलाचे उद्घाटन उशिराने देखील झालेले होते. बांधकाम सुरू असताना तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.