ठाणे - कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. मात्र असे असतानाही ठाणे महानगर पालिकेच्या कळवा येथील रुग्णालयावर मात्र असा ताण आल्याचे दिसत नाही. कारण या रुग्णालयाच्या आवारात सोमवारी रात्री शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शस्त्राने केक कापून वाढदिवस साजरा केला. रुग्णालयाला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांची सुरक्षा असतानाही हा प्रकार घडला आहे.
कळवा येथे ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय चालवले जाते. कोरोनाच्या काळात या रुग्णालयातील रुग्णांचा भार वाढला आहे. त्यातच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कोविड रुग्णालयात बदल करण्यात आल्याने इतर रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयाचा आधार आहे. त्यासाठी कळवा येथील रुग्णालयावर रुग्णांचा मोठा भार आला आहे. त्याकरिता या रुग्णालयाला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुमारे 80 सुरक्षा संरक्षण देण्याचे काम करीत आहेत. परंतु असे असतानाही सोमवारी रात्री या रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला. रुग्णालयाला सुरक्षा रक्षकांचे कवच असतानाही हे जीवघेणे शस्त्र आतमध्ये कसे आले याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.