ठाणे - साई राज ट्रॅव्हल्सच्या बसने पूर्व द्रुगती महामार्गावर बोरिवलीकडे जातांना अचानक रस्त्यात पेट घेतला. ही बस शिर्डी ते बोरिवली या मार्गावर धावते. यावेळी बसमधील २८ प्रवाशांचा आकांत केला. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाहतुकीचा चक्काजाम झाला होता. रस्त्यावर प्रवाशांचा आकांत आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
स्थानिक नागरिकांनी केले प्रवाशांना वाचविण्याचे काम-
साई राज ट्रॅव्हल्स कंपनीची बस ही राजू बावके यांच्या मालकीची असून त्यावर चालक नदीम पटेल हे काम करतात. ही बस शिर्डी ते बोरिवली या मार्गावर चालते. बस ठाण्याच्या महामार्गावरून बोरिवलीकडे जात होती. दरम्यान, बसने महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटल जवळ अचानक पेट घेतला. चालक पटेल यांनी प्रसंगवधानाने बस थांबवली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना वाचविण्याचे काम केले. या अपघातात घटनेत सुदैवाने कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण-
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलीस, पालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे अनर्थ टळला. बसमधील इंजिनच्या वायरच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज बस चालक पटेल यांनी वर्तविला.
वाहतुकीचा चक्काजाम-
अचानक महामार्गावरच धावत्या बसने पेट घेतल्याने भर रस्त्यात बस उभी करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य स्थानिक नागरिक आणि वाहन चालकाने केले. तेव्हा पेटलेल्या बसला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. तर वाहतुकीचा चक्का जाम झाला होता. काही वेळाने वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा- मालेगाव स्फोट प्रकरण : खासदार प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयात हजर राहण्यास सूट